अकोला, दि. २९- डाबकी रोडवरील एका महिलेने आपल्याविरुद्ध छेडखानीची तक्रार केल्याचा राग मनात बाळगून युवकाने छर्र्याची पिस्तूल व धारदार तलवार घेतली आणि मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास महिलेची हत्या करण्याच्या उद्देशाने युवक तिच्या घराकडे जात असल्याची डाबकी रोड पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी राहुल नरेंद्र माहोरे यास अटक करून त्याच्याकडील छर्र्याची पिस्तूल जप्त केली. आरोपीला गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. काही दिवसांपूर्वी डाबकी रोड परिसरात राहणार्या महिलेने राहुल माहोरे याच्याविरुद्ध तक्रार देऊन तो आपला नेहमी पाठलाग करतो आणि छेड काढतो. घरात घुसून त्याने विनयभंग केल्याचेही तिने म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी राहुल माहोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली होती. महिलेने केलेल्या तक्रारीमुळे राहुल व्यथित झाला होता. महिलेचा काटा काढण्याचा त्याच्या मनात विचार सुरू होता. आपल्याला महिलेमुळे त्रास सहन करावा लागला. यामुळे त्याने मंगळवारी छर्र्याची पिस्तूल आणि धारदार तलवार आणली. एमएच ३0 एएल ८३६९ क्रमांकाची मोटारसायकल घेऊन तो महिलेच्या घराकडे निघाला. दरम्यान, ही माहिती डाबकी रोड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भगवंत पाटील व त्यांच्या चमूला मिळाली. त्यांनी वेळीच दखल घेत, डाबकी रोडवरील गणेश नगर गाठले. या ठिकाणी राहुल फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील छर्र्याची पिस्तूल आणि धारदार तलवार जप्त केली आणि त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी राहुलची चौकशी केल्यावर महिलेने आपल्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिल्यामुळे आपण तिची हत्या करणार होतो, अशी माहिती दिली. पोलिसांनी वेळीच त्याला अटक केली नसती, तर मोठा अनर्थ घडला असता. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.
महिलेची हत्या करण्यासाठी गेलेला युवक गजाआड
By admin | Updated: March 30, 2017 03:01 IST