अकोला, दि. २९: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत बंधारा बांधण्यासाठीचे पाणलोट क्षेत्र असताना, याकडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रशासन व कृषी विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने येथील नालेवजा नदीतून दरवर्षी लाखो क्युसेस पाणी वाहून जात आहे. यावर्षी तरी जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत या बंधार्याचे काम करावे, अशी या भागातील शेतकरी, नागरिकांची मागणी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या गुडधी विभागाला लागूनच तीन मोठे नाले आहेत. या ठिकाणी मोठा बंधारा होऊ शकतो. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकार्यांनीदेखील पाहणी केलेली आहे. असे असताना मागील १0 वर्षांपासून या धरणाचा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. जलयुक्त शिवाराचे काम राज्यात व अकोला जिल्हय़ात होत असून, या अभियानांतर्गत येथील बंधार्यांचे काम होईल का, याकडे या भागातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. कृषी विद्यापीठाच्या गुडधी ब्लॉकला अंतर्गत नदीवजा दोन नाले आहेत. या नाल्यातून दरवर्षी पाणी वाहून जाते. कृषी विद्यापीठाने गेल्या २0-२५ वर्षांंपूर्वी येथे एका एकरावर तलावाचा प्रयोग केला आहे. तथापि, पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने हा तलाव तेव्हाच फुटला. तेव्हापासून येथून पाणी वाहून जात आहे. कृषी विद्यापीठाला लागूनच दोन नदीवजा नाल्यांचा संगम आहे; मात्र याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने दरवर्षी लाखो क्युसेस पाणी वाहून जात आहे. या ठिकाणी बंधारा झाला तर गुडधी, यावलखेड आदी गावांना पाणी मिळेल व विहिरींची पातळी वाढण्यास मदत होणार असल्याने येथे बंधारा बांधण्याची गरज आहे.
यावर्षी पीकेव्हीचा बंधारा मार्गी लागेल का ?
By admin | Updated: August 30, 2016 02:00 IST