अकोला : सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने ‘कोरोना’संदर्भात हलगर्जी न करता समन्वयाने काम करावे, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी रविवारी दिले.कोरोना संदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील स्थिती पाहता रविवारी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आढावा घेत उपाययोजनेच्या विविध सूचना दिल्या. आमदार रणधीर सावरकर, अधिष्ठाता डॉ.शिवहरी घोरपडे, उपअधिष्ठाता डॉ.के.एस.घोरपडे, वैद्याकीय अधीक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, भाजप महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, डॉ.किशोर मालोकार, जयंत मसने, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख आदिंची उपस्थिती होती. यावेळी धोत्रे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने करोना संदर्भात केलेल्या उपाययोजनांची विचारणा केली. रुग्णालयात दाखल संशयित रुग्ण, विदेशातून जिल्ह्यात दाखल झालेल्या नागरिकांची तपासणी, उपलब्ध औषध साठा आदींसंदर्भात प्रशासनाकडून सविस्तर माहिती देण्यात आली. विदर्भात काही ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सावध राहून करोना संदर्भात गांभीर्याने कार्य करण्याची गरज आहे. जिल्ह्यात आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना संजय धोत्रे यांनी केल्या.
‘कोरोना’संदर्भात समन्वयाने काम करा - संजय धोत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 18:32 IST