मूर्तिजापूर : उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने जंगलातील वन्यप्राणी आता गावाकडे धाव घेत आहेत. रानडुकरं, माकडं, हरिणांचे कळप, मोर, यासह विविध प्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे येत आहेत. जंगलातील पाण्याचे स्त्रोत बंद पडले आहेत. पाण्याच्या शोधात गावाकडे भटकंती करणार्या जनावरांचा जीव धोक्यात पडतो. तर गावातील जनावरांनासुद्धा वन्यप्राण्यांपासून धोका असतो. यामुळे शिकारीच्या घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे.पाण्याच्या शोधात येणारे वन्यप्राणी राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ओलांडत असतात. त्यामुळे नेहमीच वन्यप्राण्यांच्या अपघाताच्या घटना घडतात; पण वन विभागाच्या कार्यालयाला याची माहिती नसते. अनेकदा लहान-मोठे प्राणी रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना वाहनाच्या प्रखर प्रकाशामुळे दिपतात व अपघात होतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. वनात लागलेल्या आगीमुळे बहुतेक प्राणी सैरावैरा पळताना दिसतात. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
वन्यप्राण्यांची लोकवस्तीत धाव
By admin | Updated: May 12, 2014 19:55 IST