अकोला: खारपाणपट्टय़ातील जिल्ह्यातल्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, सध्या या गावांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या कालावधीतही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत ६४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोरा जवळील उन्नई बंधार्यात पाणी सोडले जाते आणि उन्नई बंधार्यातून ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षींच्या पावसाळ्यात सार्वत्रिक दमदार पावसाअभावी महान येथील काटेपूर्णा धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याच्या स्थितीत, या धरणातील उपलब्ध जलसाठा अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात उन्नई बंधार्यातील जलसाठा संपल्याने, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना गेल्या १५ दिवसात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार गत १८ ऑक्टोबर रोजी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोरा पाणीपुरवठा योजनेसाठी उन्नई बंधार्यात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर या योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. सध्या या योजनेंतर्गत गावांना सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काटेपूर्णा धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याच्या स्थितीत खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत हिवाळ्यातच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.
६४ गावांमध्ये पाणीटंचाई; ग्रामस्थांची पायपीट
By admin | Updated: October 23, 2014 02:02 IST