अकोला: महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांचा आठ मतांनी विजय झाला. प्रतिस्पर्धी उमेदवार अब्दुल जब्बार यांना अवघी चार मते मिळाली. मतदान प्रक्रियेतून काँग्रेसचे दोन व राष्ट्रवादीचा एक सदस्य अनुपस्थित राहिल्याने भाजपच्या ह्यविजयाह्णवर शिक्कामोर्तब झाले. त्यापूर्वी मतदान प्रक्रियेत तटस्थ राहण्याची भूमिका स्पष्ट करणार्या भारिप-बमसंने मात्र अचानक काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून मैत्रीचा सुखद धक्का दिला. मनपाच्या सोळा सदस्यीय स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया शनिवारी मनपाच्या मुख्य सभागृहात पार पडली. भाजप-शिवसेना युतीच्या वतीने विजय अग्रवाल यांनी तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीने काँग्रेसचे अब्दुल जब्बार यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता. सत्तापक्षासह विरोधकांकडे स्थायीचे समान संख्याबळ असल्याने ही निवडणूक अटीतटीची होईल, ही अपेक्षा फोल ठरली. ११ मार्च रोजी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर राजकारण्यांनी सारिपाटावर फेकलेल्या सोंगाट्यांनी रंग दाखवायला सुरुवात केली होती. मनपा सभागृहात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी हात उंचावून उपस्थित सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. सोळा संख्याबळ असलेल्या स्थायी समिती सदस्यांपैकी आठ सदस्यांनी युतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या बाजूने तर काँग्रेसचे अब्दुल जब्बार यांच्या बाजूने चार सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. काँग्रेसचे दिलीप देशमुख, रिजवाना शेख अजीज, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शमशाद बेगम शेख फरीद, अपक्ष हाजराबी अब्दुल रशीद असे एकूण चार सदस्य अनुपस्थित राहिले. सभेचे पीठासीन अधिकारी जी. श्रीकांत यांनी युतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांना विजयी घोषित केले. याप्रसंगी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त अजय लहाने यांनी विजय अग्रवाल यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिला.
अकोला मनपा स्थायी समिती सभापतीपदी विजय अग्रवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 01:58 IST