अकोला, दि. १४: आदर्श कॉलनीमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक १६ च्या मैदानावर मनपा प्रशासन आणि जलवर्धन संस्थेद्वारे खोदण्यात आलेल्या शोषखड्डय़ातील पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. सिद्धार्थ राजेश घनगावकर आणि कृष्णा राकेश बहेल अशी मृतक बालकांची नावे आहेत.व्हीएचबी कॉलनीला लागून असलेल्या मित्र नगर परिसरातील वसाहतमधील रहिवासी राजेश घनगावकर यांचा मुलगा सिद्धार्थ (८) आणि याच परिसरातील रहिवासी राकेश बहेल यांचा मुलगा कृष्णा (१२) हे दोघे मनपाच्या शाळा क्रमांक १६ च्या मैदानावर खेळत होते. या मैदानावर मनपा प्रशासन आणि शहरातील एका सामाजिक संस्थेने खोल चर खोदलेली होती. या चरीमध्येच १0 फूट खोलीचे तीन शोषखड्डे खोदण्यात आले होते. या शोषखड्डय़ांमध्ये रेती आणि विटांचे तुकडे न टाकल्याने यामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. कृष्णा आणि सिद्धार्थ हे दोघे येथे खेळत असतानाच ते शोषखड्डय़ात पडले. शोषखड्डय़ात गाळ असल्याने दोघेही या गाळात फसले. पाणी १0 फुटांच्यावर असल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. हा प्रकार एका इसमाने बघितल्याने त्यांनी आरडा-ओरड केली. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने नगरसेवक बाळ टाले यांनी दोन्ही बालकांचा पाण्यात शोध घेतला असता ते खड्डय़ातील गाळात फसल्याचे दिसून आले. दोघांनाही गाळातून काढून तातडीने सवरेपचार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले शोषखड्डय़ाचे बांधकाम अर्धवट असल्याने या शोषखड्डय़ाने दोन बालकांचा बळी घेतल्याचा आरोप नगरसेवकांसह नागरिकांनी केला. सिद्धार्थ घनगावकर याचे वडील मोलमजुरीचे काम करतात तर कृष्णाचे वडील एका हॉटेलमध्ये कामाला असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले त्यानंतर सवरेपचार रुग्णालयामध्ये त्यांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली असून या दोन्ही मुलांच्या नातेवाइकांच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
शोषखड्डय़ाने घेतला दोन बालकांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2016 02:46 IST