सचिन राऊत / अकोला : वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी घराबाहेर खिडकीत लावलेल्या कुलरच्या पाण्यात गुंगीचे औषध टाकणे आणि नंतर कटरद्वारे घराचा कुलूप कोंडा तोडून मुद्देमालावर हात साफ करण्याचा सपाटा चोरट्यांच्या एका टोळीने गत आठवड्यापासून शहराच्या काही भागात लावला आहे. देशमुख फैल, कीर्तीनगर व लहान उमरी परिसरातील काही घरांमध्ये अशा प्रकारच्या चोरीच्या घटना समोर आल्या असून, काही युवकांनी या चोरट्यांचा पाठलाग केल्यानंतर त्यांनी युवकांवर दगडफेक करून पोबारा केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री देशमुख फैलमध्ये घडला. शहरातील रेल्वे रुळानजीक असलेल्या भागातच चोरी करण्याचा धडाका चोरट्यांच्या या टोळीने लावला आहे. देशमुख फैलमधील एका डॉक्टरच्या घराबाहेरील कुलरमध्ये गुंगीचे औषध टाकल्यानंतर त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील साहित्य या चोरट्यांनी लंपास केले. त्यानंतर दुसर्याच दिवशी याच परिसरातील भाजीपाल्याच्या ठोक व्यावसायिकाच्या घरातील मोबाइल व रोख रक्कम या टोळीने लंपास केली. हा प्रकार काही युवकांच्या लक्षात येताच त्यांनी या चोरट्यांचा पाठलाग केला; मात्र चोरट्यांजवळ असलेल्या पिशव्यांमधील दगड या युवकांच्या अंगावर भिरकावून चोरटे देशमुख फैलमधून पसार होण्यात यशस्वी झाले. चोरट्यांची ही टोळी एक पिशवी सोबत ठेवत असून, यामध्ये रेल्वे रुळावरील दगड, दरवाजा तोडण्यासाठी कटर, धारदार शस्त्र, दोरीचा समावेश असल्याची माहिती या चोरट्यांचा पाठलाग करणार्या काही युवकांनी दिली. चोरट्यांच्या या टोळीने अजब-गजब फंडे वापरून चोरीचे सत्रच सुरू केले असून, त्यांनी एका आठवड्यात चार ते पाच घरातील मुद्देमालावर हात साफ केल्याची माहिती आहे.
चोरीसाठी कुलरमध्ये गुंगीच्या औषधाचा वापर
By admin | Updated: May 11, 2015 02:32 IST