अकोला/आकोट: आकोट येथील क्रिकेट सट्टय़ाकरिता वापरण्यात आलेले सिमकार्ड बोगस दस्तऐवजाद्वारे तयार करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी नरेश भुतडासह सहा जणांविरुद्ध १ एप्रिल रोजी गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत. क्रिकेट सट्टाकरिता यवतमाळ जिल्हय़ातील पांढरकवडा येथील लक्ष्मण किष्टान्ना वल्लमवार यांचे कागदपत्र व छायाचित्राचा गैरवापर करून स्वत:च्या फायद्यासाठी त्यांच्या दस्तऐवजावर नवीन सिमकार्ड घेण्यात आले. याबाबतची तक्रार १ एप्रिल रोजी वल्लमवार यांनी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली होती. या तक्रारीवरून आरोपी नरेश लक्ष्मीनारायण भुतडा, श्याम मधुकर कडू, चेतन महेश जोशी, वीरेंद्र दर्यावसिंग रघुवंशी (सर्व रा.आकोट), पंकज एंटरप्रायजेस पांढरकवडा, वणी येथील गणराज मार्केटिंगचा मालक रितेश शिंगवाम या सहा जणांविरुद्ध भादंविच्या कलम ४२0 ( फसवणूक), ४६८, ४७१ (खोटे दस्तऐवज तयार करणे व खरे असल्याचे भासविणे), ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांचे मार्गदर्शनाखाली आकोट ग्रामीणचे ठाणेदार किशोर शेळके करीत आहेत.
सट्टय़ाकरिता बोगस सिमकार्डचा वापर!
By admin | Updated: April 2, 2016 01:33 IST