दरम्यान, मुंडगाव येथील शेतकरी सेवकराव खंडूजी नागोलकार यांनी १५ सप्टेंबर २०२० रोजी व सुनील श्रीराम सदार व इतर शेतकऱ्यांनी २८ डिसेंबर २०२० रोजी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार पालकमंत्री बच्चू कडू यांनी चौकशीचा आदेश दिला हाेता. परंतु शेतकऱ्यांनी उडीद, मूग नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा झाली नसल्याचे तक्रारीत म्हटले. याबाबत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता. परंतु संबंधितांनी खुलासा कार्यालयाकडे सादर केला नाही. मुंडगावचे मंडळ अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी यांना मुंडगाव सांझ्यातील मूग, उडीद पीक नुकसान भरपाई न मिळाल्याच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितले होते. त्यांच्या अहवालामध्ये मुंडगाव सांझ्यातील नयनापूर, अल्यारपूर, सुलतानपूर, मुंडगाव येथील शेतकऱ्यांचा पीक पेरा जास्त असल्याचे दिसून आले. तसेच पीक सर्वेक्षणाच्या कामासाठी मुंडगावचे तलाठी आर. डब्लू. वानखडे, ग्रामसेवक ए.डी. शेंडे, कृषी सहायक आकाश ठाकरे यांनी हलगर्जी केल्यामुळे मुंडगाव इतर गावांमधील शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहिले. त्यामुळे या तिघांच्या विरुद्ध नैसर्गिक आपत्ती अधिनियम २००५ कलम ५६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
उडीद, मूग पीक नुकसान सर्वेक्षणाच्या कामात हलगर्जी भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:18 IST