वाशिम: अज्ञात व्यक्तीला सरणावर टाकून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना वाशिम ते अनसिंग मार्गावर असलेल्या दगडउमरा शेतशिवारात घडली. दगडउमरा येथील बाळासाहेब माधव जाधव यांच्या शेतामधील धुर्यावर जळून खाक झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती बाळासाहेब जाधव यांनी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार राहुल जगदाळे यांच्या पथकाने लगेच घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्या ठिकाणी जळालेल्या मृतदेहाजवळ एक सायकल आढळून आली.
माळेगावच्या घटनेला पुन्हा उजाळागेल्या चार महिन्यांपूर्वी माळेगाव येथे कडब्याच्या गंजीमध्ये एका व्यक्तीला जाळून मारून टाकले होते. त्या व्यक्तीचा व आरोपीचा अद्यापही शोध लागला नाही. त्या घटनेमध्ये ज्याप्रकारे व्यक्तीला मारून टाकले तीच पद्धत या घटनेमध्ये वापरण्यात आली. मृतदेह वाशिमच्या इसमाचा ? दगडउमरा शेतशिवारात उघडकीस आलेल्या घटनेतील मृतदेह हा एकनाथ दौलत राऊत (वय ६0) यांचा असल्याचा संशय त्यांचा मुलगा संतोष राऊत याने व्यक्त केला. मृत एकनाथ राऊत हे नेहमी दगडउमरा येथे सैलानी बाबांच्या दर्शनासाठी व गावामध्ये केश कर्तनाचे काम करण्यासाठी नेहमी जात असत. त्यांच्या मृतदेहाजवळ आढळून आलेली सायकलसुद्धा राऊत यांचीच असल्याचे त्यांनी पोलिसांजवळ सांगितले.