मूर्तिजापूर: तालुक्यातील उनखेड येथे रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. गत दहा दिवसांपासून परिस्थिती जैसे थे असल्याने संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले. रोहित्राची तत्काळ दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
तालुक्यातील उनखेड येथे रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने दहा दिवसांपासून वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महावितरणच्या ढेपाळलेल्या कारभाराला कंटाळून संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयात धडक देत कनिष्ठ अभियंता देशमुख यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी कनिष्ठ अभियंता देशमुख यांनी दखल घेऊन प्रकरण लवकरच निकाली काढण्याचे आश्वासित केल्यामुळे आंदोलक शांत झाले. यावेळी रंभापूर गट ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत इंगळे यांनी विद्युत वितरण विभागाला तीन दिवसांत प्रकरण निकाली काढण्याची मागणी केली. अन्यथा प्रजासत्ताकदिनी उपोषण करण्याचा इशारा दिला. यावेळी बाळासाहेब घोरमोडे, सुधाकर देशमुख, संभाजी वानखडे, विलास सावळे, नीलेश मेश्राम, गुरुदास सहारे, वैभव टिपरे, अनिकेत तायडे, सोपान घोरमोडे, आशिष घोरमोडे, विशाल वानखडे, पवन खेडकर आदी उपस्थित होते. (फोटो)