वाशिम : ट्रक आणि मोटारसायकलच्या भीषण अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी वाशिम जिल्ह्यातील नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील वाई गावाजवळ घडली. गुरूवारी रात्री झालेल्या अन्य एका अपघातात मोटारसायकलस्वार ठार झाला. मृतांची नावं अमोल विठ्ठलराव मेश्राम (१९) आणि मुकूल प्रभू माजलगावकर (१९) अशी असून, दोघेही वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी आहेत. ते वाई येथील यशवंत विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होते. शुक्रवारी दोघेही मोटारसायकलने वाई येथे जात होते. एमएच २0 सीटी-५८३ क्रमांकाचा कंटेनर शेलूबाजार येथून कारंजाकडे येत होता, तर त्याचवेळी एमएच ३६ एच -५११ क्रमांकाचा मेटॅडोर कारंजाहून शेलूबाजारकडे जात होता. यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विद्यार्थ्यांची मोटारसायकल दोन्ही वाहनांच्या मधात येऊन, झालेल्या भीषण अपघातात दोन्ही विद्यार्थी जागीच ठार झाले. *अपघातात मोटारसायकलस्वार ठार दरम्यान, अज्ञात वाहनाच्या धडकेत मानोरा तालुक्यातील चिस्तळा येथील ४५ वर्षीय मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास घडली. विनोद नामदेव धोंगडे हे गुरूवारी मानोरा येथून राहत्या घरी, चिस्तळा येथे मोटारसायकलने जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. चिस्तळानजिकच्या वळणावर झालेल्या या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मोटारसायकल अपघातात दोन विद्यार्थी ठार
By admin | Updated: February 7, 2015 02:28 IST