अकोला: गांधी रोडवरील स्वामी संकुलमधील आठ दुकाने फोडणार्या दोन अट्टल चोरट्यांना सिटी कोतवाली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. चोवीस तासातच सिटी कोतवाली पोलिसांनी या चोरीचा छडा लावला आहे. शेख जुनेद आणि लखन नावकार अशी दोन्ही चोरट्यांची नावे आहेत.स्वामी संकुलमध्ये असलेल्या हाने सटी गारमेंट, अविनाश एंटरप्राइजेस, नारायण इलेक्ट्रॉनिक्स, करण ज्वेलर्स, फॅशन क्रेज, न्यू मिलन गारमेंट्स, मिलन गारमेंट्स आणि विदर्भ वाईन बारचे लोखंडी शटर अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास तोडले. त्यानंतर या आठही दुकानातील मुद्देमाल लंपास करण्याच्या हालचाली सुरू असतानाच यावेळी रात्र गस्तीवर असलेले सिटी कोतवाली पोलिसांचे वाहन पोहोचल्याने चोरटे चोरी करण्याआधीच घटनास्थळावरून पसार झाले. सिटी कोतवाली पोलिसांना व या परिसरातील सुरक्षा रक्षकांना स्वामी संकुलमध्ये चोरट्यांच्या हालचाली सुरू असल्याचा संशय आला; मात्र तोपर्यंत चोरटे घटनास्थळावरून पसार झाले होते. पोलिसांनी रात्री घटनास्थळ गाठून आठही दुकानांची तपासणी केली. चोरट्यांनी आठही दुकानांचे शटर वाकविले होते, तर काही दुकानांचे कुलूप तोडण्यात चोरटे यशस्वी झाल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीवरून दिसून आले. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला. चोवीस तासांच्या आतच दुकाने फोडणार्या दोन्ही अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली असून यामध्ये लखन नावकार व मोबाइल चोरीत पकडलेला शेख जुनेद या दोघांचा समावेश आहे. या दोन्ही चोरट्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
आठ दुकाने फोडणारे दोघे गजाआड
By admin | Updated: July 19, 2016 02:01 IST