खामगाव: विजयादशमी रोजी काल शहरात अज्ञात चोरट्यांची बोबडे कॉलनीतील घर फोडले तसेच इतरही ५ ते ६ ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला. या चोरट्यांना पकडण्यात शहर पोलिसांना यश आले असून दोघांना अटक करण्यात आली तर तिघे फरार होण्यात यशस्वी झाले. या चोरट्यांकडून पोलिसांनी कारसह घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, तलवार असा ऐवज जप्त केला. तर चोरट्यांनी कालच शहरात ५ ते ६ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तर या चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल विजयादशमीच्या दिवशी शहरातील बोबडे कॉलनी भागातील रहिवासी अनिल विश्वनाथ देवताळू हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून लाल रंगाच्या इंडिका कारमधून आलेल्या ४ ते ५ जणांनी अनिल देवताळू यांचे घर फोडले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. दरम्यान लाल रंगांची इंडिका कार पोलिसांना बाळापूर नाका परिसरातील एका गॅरेजवर उभी दिसली असता पोलिसांनी त्या इंडिका कारची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना इंडिका कारमध्ये लोखंडी गज, तलवार, चपट्या पट्या असे साहित्य आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या साहित्यासह एच.एच.२0 बी.एल. ४0९५ क्रमांकाची इंडिका कार जप्त करुन रशीद शहा उर्फ तलवारसिंग शहा, शाह (वय३८) व अब्दुल अफसर उर्फ गब्बर अब्दुल मुनाफ (वय ४२) रा.नायगाव जि.अकोला या दोघांना ताब्यात घेतले. तर तीन जण फरार होण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी शहर पोलिसांनी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक फटिंग यांच्या फिर्यादीवरुन कलम ३९९, ४0२ भादंवि सहकलम ४/२५ आर्म अँक्टनुसार गुन्हा दाखल करुन अटक केली. तसेच या चोरट्यांची चौकशी केली असता त्यांनी शहरातील ५ ते ६ ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घरफोडी करणा-या दोघांना अटक, ३ फरार
By admin | Updated: October 5, 2014 01:31 IST