अकोला: जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात गुरुवारी सायंकाळी गोपाल कदम नामक युवकास मारहाण करणार्या दोघांची मंगळवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी केली. सोनू जाधव व धनंजय बिल्लेवार अशी आरोपींची नावे आहेत. कृषी नगरमध्ये २0१५ झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपी गोपाल कदम हा गुरुवार १४ जुलै रोजी न्यायालयात तारखेवर हजर राहण्यासाठी उपस्थित होता. यावेळी दुपारी १२ वाजेच्या सुमारापासून आधीच उपस्थित असलेल्या याच प्रकरणाशी संबंधित असलेले सोनू जाधव, धनंजय बिल्लेवार व त्यांच्या आणखी दोन साथीदारांनी गोपाल कदम याच्याशी वाद सुरू केला. वाद वाढल्यानंतर सोनू जाधव, बिल्लेवार व त्यांच्या साथीदारांनी गोपाल कदम याच्या डोक्यावर फायटरने हल्ला चढविला. गोपाल कदमला फायटरने मारहाण केल्यानंतर तो जमिनीवर कोसळला होता; मात्र आरोपींनी त्यानंतरही त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरूच ठेवली. हा प्रकार न्यायालय परिसरातील पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी गोपाल कदमकडे धाव घेतली; परंतु मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला; मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. रामदासपेठ पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला. शनिवारी या प्रकरणातील सोनू जाधव व धनंजय बिल्लेवार या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना १९ जुलैपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली. मंगळवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी केली.
न्यायालयाच्या आवारात मारहाण करणारे दोघे कारागृहात
By admin | Updated: July 20, 2016 01:27 IST