अकोला: जुने शहरातील जोगळेकर प्लॉटमध्ये २00२ मध्ये झालेल्या जातीय दंगलप्रकरणी न्यायालयात सरकार पक्षाला फितुर होणारे पोलीस कर्मचारी रवी उगवेकर व सुनील शेगोकार यांना सोमवारी निलंबित करण्यात आले. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी दोघांनाही निलंबित करण्याचा आदेश दिला.अकोला येथील जुने शहरातील जोगळेकर प्लॉटमध्ये ३0 मार्च २00२ रोजी जातीय दंगल उसळली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामध्ये १४ आरोपींविरुद्ध दंगलीसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून, सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणातील आरोपी शेख जब्बार शेख महेबुबला पोलीस कर्मचारी रवी उगवेकर यांनी अटक केली होती; मात्र त्यानंतर उगवेकर यांनी न्यायालयात साक्ष देताना आरोपीस ओळखत नसल्याचे सांगितले. दुसरा पोलीस कर्मचारी सुनील शेगोकार यांनी शेख अब्दुल रहेमान शेख सुभान ऊर्फ बाबूसाहाब आणि मो. फजलू अ. करीम हे दोघे त्यांचे बालपणीचे मित्र असून, त्यांच्याकडून अशा प्रकारची हाणामारी शक्यच नसल्याची साक्ष न्यायालयात दिली होती. त्यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने या दोन्ही पोलीस कर्मचार्यांना फितुर झाल्याचे घोषित केले. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस अधीक्षक मीणा यांनी दोन्ही पोलीस कर्मचार्यांना निलंबित केले असून, त्यांची खातेनिहाय चौकशीचा आदेश दिला आहे. आकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनोरे यांच्याकडे ही खाते चौकशी देण्यात आली आहे.
दोन पोलीस निलंबित
By admin | Updated: April 19, 2016 02:29 IST