अकोला: एक लाख रुपयांमध्ये एक किलो सोने देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील महिलेला लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, टोळीतील एक अल्पवयीन मुलगी व एका इसमाला पोलिसांनी अटक केली. दोघांनाही शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. पुणे येथील धनकवडीत राहणार्या ज्योती गंगाराम राठोड (२८) यांना एका टोळीने मोबाइल फोन करून एक लाख रुपयांमध्ये एक किलो सोने देण्याचे आमिष दाखविले. सुरुवातीला या महिलेला टोळीतील सदस्यांनी अकोल्यात बोलावून सोन्याचा तुकडा दिला. सोने खरे असल्याचे पाहून, ज्योती राठोड आमिषाला बळी पडली. ती एक लाख रुपये घेऊन सोने घेण्यासाठी अकोल्यात आली. टोळीतील गणेश वामनराव अजबे (४९ रा. हमालपुरा अमरावती), सुखदेव पंडित चव्हाण आणि त्याची अल्पवयीन मुलगी यांनी महिलेला आपातापा रोडवरील दमाणी नेत्र रुग्णालयाजवळ नेले. या ठिकाणी महिलेला मारहाण करून तिच्याकडून एक लाख रुपये हिसकावून पसार झाले होते. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक चाटी, शेख हसन, रवी इरचे, एजाज अहमद, माजीद यांनी घटनेचा तपास करून शनिवारी दुपारी अमरावती येथील गणेश अजबे याला आणि कारंजा येथील अल्पवयीन मुलीस अटक केली. त्यांच्याकडून ३७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. मुलीचे वडील सुखदेव पंडित चव्हाण हे टोळीचे सूत्रधार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दोघा आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.
सोन्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 04:30 IST