अकोला: श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बी.ए. इंग्रजी आणि एम. कॉम इंग्रजी या दोन विद्यार्थीपयोगी अभ्यासक्रमांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून परवानगी देण्यात आली आहे. शिवाजी महाविद्यालयात आता विद्यार्थ्यांना बी.ए. इंग्रजी आणि एम.कॉम इंग्रजीला प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची होणारी फरपट कमी होणार असल्याची प्रतिक्रिया शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी दिली. बी.ए. इंग्रजी आणि एम.कॉम इंग्रजी विषयाकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा आहे; मात्र जिल्हय़ात त्या तुलनेत जागा कमी असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नव्हता. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे यासाठी शिवाजी महाविद्यालयाचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. विद्यार्थ्यांना होत असलेला त्रास लक्षात घेता शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी तातडीने प्रस्ताव तयार करून परवानगीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये सादर केला. त्यानंतर पाठपुरावा घेताच विद्यापीठाने बी.ए. इंग्रजी आणि एम. कॉम इंग्रजी या दोन विषयांना परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या शैक्षणिक सत्रापासूनच या दोन विषयांचा लाभ होणार आहे. बी.ए. प्रथम वर्षाला अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि इंग्रजी वाड्मय घेऊन इंग्रजी माध्यमामध्ये प्रवेश घेता येणार आहे. तर एम. कॉमसाठीही विद्यार्थ्यांना चांगली सुविधा महाविद्यालयाने उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी दिली.
शिवाजी महाविद्यालयात दोन नवे अभ्यासक्रम
By admin | Updated: August 1, 2016 01:12 IST