बुलडाणा: सततची नापिकी, डोक्यावरील कर्जाचा डोंगर यामुळे नैराश्य आलेल्या दोन वयोवृद्ध शेतकर्यांनी आत्महत्या केल्याच्या दोन घटना १२ एप्रिल रोजी जिल्ह्यात उघडकीस आल्या. देऊळगावराजा तालुक्यातील सुरा या गावातील तुकाराम विक्रम चेके या ६0 वर्षीय शेतकर्याने मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शेताजवळील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सतत तीन वर्षांपासून नापिकीचा सामना करीत असलेल्या या शेतकर्याकडे दोन एकर शेती होती. यावर्षी तिबार पेरणी करूनही त्यांना काहीच उत्पादन झाले नव्हते. त्यांच्यावर सेंट्रल बँकेच्या देऊळगाव मही शाखेचे कर्ज होते. बँकेचे कर्ज तसेच नातेवाइकांकडून उसनवार घेतलेले पैसे कसे फेडावे, याची चिंता त्यांना होती. या आर्थिक विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात अपंग मुलासह दोन मुली, पत्नी असा परिवार आहे. आत्महत्येची दुसरी घटना चांडोळ येथे उघडकीस आली. येथील लिंबाजी सखाराम सोनुने (६0) यांनी त्यांच्या शेतातील बोरीच्या झाडास मंगळवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. सोनुने यांच्याकडे आठ एकर कोरडवाहू शेती होती. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्रच्या चांडोळ शाखेचे एक लाख रुपये कर्ज थकीत होते. यावर्षी उत्पादन न झाल्याने कर्ज कसे फेडावे, या काळजीत ते होते. यातूनच त्यांनी मंगळवारी सकाळी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात दोन शेतकरी आत्महत्या
By admin | Updated: April 13, 2016 01:12 IST