अकोला : शेतात फवारणी करताना दोन शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. यातील एक शेतकरी वाशिम जिल्ह्यातील वाघोडा वाकी (ता.कारंजा) येथील, तर दुसरा शेतकरीअकोला जिल्ह्यातील नया अंदुरा येथील रहिवासी आहे. दोन्ही शेतकºयांवर जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. रविवार ७ जुलै रोजी वाशिम जिल्ह्यातील वाघोडा वाकी (ता.कारंजा) येथे घडली. येथील शेतकरी अतिष राठोड हे शेतात किटकनाशकाची फवारणी करत असताना श्वसनामार्फत त्यांना विषबाधा झाली. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. दुसरी घटना अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील नया अंदुरा येथे घडली. येथील शेतकरी तेजराव दादाराव तायडे हे सोमवार ८ जुलै रोजी सकाळी शेतात फवारणी करत असताना त्यांनाही श्वसनाद्वारे विषबाधा झाली. त्यांना जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. दोन्ही रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये उपचार सुरू असून, दोघांच्याही प्रकृतीमध्ये सुधारणा आहे.
दोन शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 18:11 IST