अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीसंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी मांडलेल्या भावनांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी शासनाकडे पाठविण्यात आला.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ५ एप्रिलपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यानुसार अत्यावश्यक सेवा आणि जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर गत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये अत्यावश्यक सेवा व जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्यात येत असल्याने व्यापारी, दुकानदार व त्यांच्यावर अवलंबून असलेले कामगार, मजूर इत्यादी घटक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कडक निर्बंध घाला; मात्र लाॅकडाऊन लागू करण्यात येऊ नये, दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशा प्रकारच्या भावना व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत मांडल्या होत्या. तसेच कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीत व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. दरम्यान, व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी (दि. १०) शासनाकडे पाठविण्यात आला.