कनेरगाव नाका (वाशिम) : कृषीप्रधान देश म्हणून लौकिक असलेल्या भारतात प्राचीन काळापासून शेतीसाठी बैलांचा वापर करण्याची प्रथा आहे. बळीराजा वर्षभर राबून बैलांच्या भरवशावर शेती करतो म्हणून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने पोळा हा सण साजरा करण्यात येतो; परंतु अलिकडच्या काळात शेतीची सर्व कामे बैलांऐवजी ट्रॅक्टरने केली जात असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या वाशिम जिल्हय़ातील कनेरगाव नाका येथे बैलांसह ट्रॅक्टर्सचाही पोळा भरविण्यात आला.कनेरगाव नाका येथे दरवर्षी हा अनोखा पोळा भरविण्यात येतो. हा आगळावेगळा पोळा पाहण्यासाठी दूरवरून अनेक लोक येथे येतात. त्यामुळे हा पोळा कुतुहलाचा विषय ठरत आहे. तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात बैलांचे श्रम मागे पडले असून, विविध यंत्रांनी त्यांची जागा घेतली आहे. शेतीमधील नांगरणी, वखरणी, पेरणी आदि कामांसाठी बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर करण्याची प्रथा ग्रामीण भागात सुरू झाली. शेतकर्यांना ट्रॅक्टरची साथ मिळाल्याने कनेरगावात १४ वर्षांपूर्वी कै. शरद केशवराव जोशी यांनी बैलांसोबतच ट्रॅक्टरचा पोळा भरविण्याची संकल्पना मांडली. त्याला प्रतिसाद मिळाला आणि पहिल्याच वर्षी १0 ट्रॅक्टर सजवून पोळय़ात सहभागी करण्यात आले. ही प्रथा तेव्हापासून कायमच असून, दरवर्षी पोळय़ात येथे ३0 ते ३५ ट्रॅक्टर सहभागी होतात. यावर्षीच्या पोळ्य़ात ३२ ट्रॅक्टर्स सहभागी झाले होते. पोळय़ाच्या दिवशी या ट्रॅक्टर्सची मान्यवरांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर, गावातून मिरवणूक काढण्यात आली. पोळा फुटल्यानंतर घरोघरी बैलांप्रमाणेच या ट्रॅक्टर्सचीही पूजा करण्यात आली.
पोळ्य़ाच्या तोरणाखाली बैलांच्या दिमतीला ट्रॅक्टर्स !
By admin | Updated: August 26, 2014 22:46 IST