अतुल जयस्वाल
अकोला : पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सूर्याभोवती काहीशा लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असताना पृथ्वी व सूर्य यांच्यामधील अंतर कमी-अधिक होत असते. नववर्षाच्या प्रारंभी शनिवारी ४ जानेवारीला या दोघांमधील अंतर सर्वांत कमी असणार आहे.
एरव्ही पृथ्वी व सूर्य यामधील सरासरी अंतर हे १४ कोटी ९६ लाख किलोमीटर एवढे असते. शनिवारी ४ जानेवारीच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी पृथ्वी व सूर्यातील अंतर १४ कोटी ७० लाख ९८ हजार ८८० किमी एवढे राहील. याचा अर्थ पृथ्वी, सूर्य यांच्यामधील शनिवारचे अंतर हे सरासरी अंतरापेक्षा सुमारे २६ लाख किलोमीटरने कमी असेल. परिणामी, या दिवशी सूर्यबिंबाचा आकार नेहमीपेक्षा मोठा राहील. कमी अंतराच्या अशा स्थितीला उपसूर्य स्थिती म्हणूनसुद्धा ओळखतात. याविरुद्ध असलेल्या अपसूर्य स्थितीत पृथ्वी व सूर्य यामधील अंतर हे १५ कोटी २६ लाख किलोमीटर एवढे असते.
उपसूर्य व अपसूर्य स्थिती म्हणजे काय?- पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून कमीत कमी अंतरावरील स्थिती म्हणजे उपसूर्य स्थिती. या स्थितीत सूर्यबिंब आकाराने मोठे दिसते. - पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावरील स्थिती म्हणजे अपसूर्य स्थिती. सूर्याचा आकार काही प्रमाणात कमी दिसतो.