वाशिम : परीक्षा संपल्या आहेत. मात्र मनमोकळेपणाने खेळण्यावर घरच्यांची पाबंदी आजही आहेच. कडक उन्ह बघता आई-बाबा उन्हा-तान्हात खेळण्यास जाऊ देत नाहीत. तर घरात बसून टिव्ही बघायचा तरी किती. यावर तोडगा म्हणून मुलांनी सध्या गल्ली क्रिकेटचा फंडा शोधून काढलाय. उन्हात खेळत नाही असे उत्तर देत मोहल्यातल्या मित्रांची टिम घेऊन सध्या गल्लीतल्या गल्लीतच क्रि केटचे सामने खेळले जात आहेत. आयपीएलचे सामने तरी एका ठराविक काल र्मयादेत संपतात. मात्र गल्ली क्रिकेटचे सामने सकाळी सुरू झाल्यानंतर फक्त जेवणाच्या ब्रेकसाठीच थांबविले जात आहेत. कित्येकांना तर जेवणाचा भानही राहत नसल्याचे चित्र आहे. यामुळेच बच्चेकंपनीवर सध्या गल्ली क्रि केटचा ज्वर चढल्याचे दिसून येत आहे. क्रिकेट हा खेळ म्हणजे सर्व भारतीयांसाठी आणि खास करुन बच्चे कंपनीचा जीव की प्राण. वर्षभर मुले वेळ काढून खेळत असतात. आता तर लहान मुलांच्या हक्काच्या सुट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे बघावे तेथे गल्लीबोळात क्रिकेटचे सामने रंगले असल्याचे नजरेस पडत आहे. मुळात क्रि केट हा खेळ श्रीमंतांचा कमी आणि गरीबांचा जास्त. त्यातल्या त्यात गल्ली क्रिकेटसाठी तर खूप खर्च नसतोच. साधी बॅट , प्लास्टिकचा बॉल, स्टॅम्प म्हणून खुर्ची, सायकलची रिंग, साध्या तीन काड्या आणि दुसरीकडे एखादी वीट किंवा दगड असे कुठलेही साधन आणि चार-पाच गडी असले की झाले, गल्लीतील क्रिकेट सुरू. जागाही भरपूर लागत नाही. मॅचही कमीत कमी ओव्हरची, असा सुटसुटीत खेळ असल्याने गल्या-गल्यांमध्ये सध्या क्रिकेटच्या मॅचेस व्हायला लागल्या असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
गल्ली क्रिकेटचा ज्वर
By admin | Updated: May 10, 2014 22:44 IST