अकोला: शहरात मुख्य रस्त्यांवर अतिक्रमकांनी अक्षरश: बजबजपुरी मांडली आहे. रस्त्यावरून वाट काढताना अकोलेकरांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. अशा मुख्य रस्त्यांवरचे अतिक्रमण दिवसातून तीन वेळा काढण्याचे महापालिका आयुक्त अजय लहाने यांचे अतिक्रमण विभागाला आदेश आहेत. आयुक्तांच्या आदेशाचा विसर पडल्यामुळे की काय, अतिक्रमण विभागाकडून दिवसातून एक वेळ अतिक्रमकांना हुसकावण्याची थातूरमातूर कारवाई होत असल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ व इतरही भागात अतिक्रमकांनी रस्त्यालगत दुकाने थाटली आहेत. अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असताना महापालिकेचा अतिक्रमण विभाग त्याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येते. गांधी रोडवरील मुख्य चौकात अक्षरश: रस्त्यावर लघुव्यावसायिकांसह किरकोळ व्यावसायिकांनी हातगाडीवर दुक ाने थाटल्याचे चित्र आहे. जुना भाजी बाजार ते मोहम्मद अली मार्ग, गांधी चौक ते सिटी कोतवाली, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज, खुले नाट्यगृह ते धिंग्रा चौक आदी मुख्य बाजारपेठेला अतिक्रमकांनी विळखा घातला आहे. मनपासमोरच्या कवर्च आर्केड इमारतीलगत अतिक्रमकांची बजबजपुरी माजली असून, नागरिकांना पायी चालणेदेखील मुश्कील झाले आहे.
दिवसातून तीनदा अतिक्रमण निर्मूलनाचा आदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 02:32 IST