अकोला: वातावरणातील बदल आणि साचलेल्या पाण्यामध्ये झालेल्या डासांच्या उत्पत्तीने जिल्हय़ातील तब्बल २४७ गावांमध्ये डेंग्यू, डेंग्यूसदृश आजार आणि जलजन्य आजारांचे थैमान माजले आहे. यामध्ये कट्यार येथे यापूर्वीच डेंग्यूने दोघांचा मृत्यू झाला असून, आता आणखी तिघे जण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे गावात दहशत पसरली असून, डेंग्यू पॉझिटिव्ह आढळलेल्या दोघांवर खासगी तर एकावर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अकोला शहरासह जिल्हय़ातील २४७ गावांत डेंग्यूचा उद्रेक झाला असून, आतापर्यंत जवळपास १७ जणांचा डेंग्यूने बळी घेतला आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये १00 हून अधिक रुग्णांच्या तपासणीत डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये कट्यार येथील राजाराम विठ्ठल सोळंके आणि सविता ढोरे या दोघांचा मृत्यू झाला आहे. आता आणखी तिघे पॉझिटिव्ह आढळून आले असून, भास्कर वामन नावकार (४१), राधा भीमराव घावट (१0), संकेत प्रकाश देवकार (0४), अशी त्यांची नावे आहेत. या तीनही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांना डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. डेंग्यू व डेंग्यूसदृश तापाचा प्रचंड उद्रेक झाला असताना आरोग्य विभागाने कागदोपत्रीच उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. ग्रामीण भागात डास प्रतिबंधक धुरळणी व ब्लिचिंग पावडरचा उपयोग होत नसून, शहरातही प्रचंड घाण साचली आहे. या दोन्ही बाबींच्या परिणामी डासांची प्रचंड प्रमाणात उत्पत्ती होत आहे. त्यामुळे २४७ गावांतील प्रत्येक दोन ते तीन घरांमागे एक डेंग्यूचा रुग्ण आढळून येत आहे.
कट्यार येथे डेंग्यूचे आणखी तीन रूग्ण
By admin | Updated: November 17, 2014 01:33 IST