अकोला: अकोला वन विभागातील आठ वनपरिक्षेत्रातील १२५ बिटमध्ये बुधवारच्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन विभागाच्या वतीने प्राणी गणना करण्यात आली. प्राणी गणनेसाठी पाणवठ्याजवळच्या मचाणावर बसलेल्यांना आगळा-वेगळा अनुभव आला. तहानेने व्याकूळ असलेल्या तडसाने पाणवठ्यावरील हरणाची आयती शिकार सोडून आधी तहान भागविली. हा प्रसंग वन कर्मचाऱ्यांनी बुधवारी रात्री अनुभवला. १२५ वन कर्मचारी आणि निसर्गप्रेमी प्राणी गणनेच्या मोहिमेत प्रामुख्याने सहभागी झाले होते. आलेगाव वनपरिक्षेत्रात दोन हरणाचे बछडे (पाडस) पाणवठ्यावर पाणी पीत होते. दरम्यान, तहानेने व्याकूळ असलेला तडस (हायना) येथे पाणी प्यायला आला. पाणवठ्यावर निरीक्षणासाठी बसलेल्यांना आता शिकार होते अशी अपेक्षा होती; मात्र तडसाने आयती शिकार सोडून आधी तहान भागविण्यास प्राधान्य दिले. या कालावधीत हरणाच्या बछड्यांनी तडसाची नजर चुकवून येथून धूम ठोकली. हा अनुभव सर्वांनाच अनपेक्षित होता.दरम्यान, प्राणी निरीक्षण करणाऱ्यांना उत्तर डोहाकडील एका झाडावर डोळे चमकताना दिसले. अस्वल असल्याचा अंदाज येत होता; मात्र काही काळानंतर कळले की, दोन मसन्याउद आहेत. त्यानंतर निसर्गप्रेमींना नीलगाय, सायड आणि अस्वल दृष्टीस पडले. पातूर वनपरिक्षेत्रात प्राणी गणना करताना चिंचखेड बिटमधील सावदरा तलावाजवळ पाणी प्यायला आलेला बिबट दिसला. नीलगायीच्या कळपात शिकार करण्यासाठी तो सज्ज होता. त्यानंतर येथेच कोल्हा आणि त्याच वळणावर दोन बिबट समोर बसलेले दिसले.अकोला वनविभागातील ६५ पाणवठ्यांवर सलग दोन दिवस ही प्राणी गणना केली गेली. यामध्ये काही ठिकाणी खवल्या मांजर, काळवीट आणि लांडगेही दृष्टीस पडले.बुद्ध पौर्णिमेच्या स्पष्ट चंद्रप्रकाशात दरवर्षी प्राणी गणना केली जाते. यंदाही ही गणना करण्यासाठी अकोला वन विभाग सज्ज असून, बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ पर्यंत ही प्रक्रिया राबविली गेली. तृण आणि मांसाहारी असलेल्या प्राण्यांची मागील वर्षांची नोंद, त्या तुलनेत यंदा कोणत्या प्राण्यांची संख्या घटली, कोणत्या प्राण्यांची संख्या वाढली, याची संपूर्ण माहिती आठ दिवसानंतर येणाऱ्या अहवालातून समोर येणार आहे. प्राणी गणनेसाठी उपवनसंरक्षक प्र.ज.लोणकर, नितीन गोंडाणे, एस.जी. सोनोने, आर.डी. गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ देवरे,सोनुंना,आठोडे,जगताप,झुजारे, गुलाब खिल्लारे,कैलास ताजणे, शरद भागवत, विलास पाटील, बाळ काळणे, संजय वाघमारे,राजेश ज्ञानेश्वर,वन्यजीव संरक्षक कक्षप्रमुख गोविंद पांडे, गजानन देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
तहानेने व्याकूळ तडसाने सोडली हरणांची शिकार
By admin | Updated: May 12, 2017 08:34 IST