अकोला : यंदाच्या पावसाळ्य़ात जुलै व ऑगस्ट महिन्यात साधारणत: दोन खंड पडण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे कृषी विभागाने आतापासूनच नियोजन करण्याची गरज असल्याची सूचना विभागीय संशोधन व सल्लागार समितीच्या ५५ व्या सभेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांनी कृषी विद्यापीठ व कृषी विभागाला केली. कृषी विद्यापीठाच्या कमिटी हॉलमध्ये ही सभा पार पडली. अध्यक्षस्थानी डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. या सभेला कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य तथा आमदार जव्हेरी, डॉ.प्रदीप इंगोले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. विजय माहोरकर, कृषी सहसंचालक कार्यालय प्रतिनिधी डॉ. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.गतवर्षी झालेल्या अतवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले आहे. बियाणे पेरणीपूर्वी उगवणशक्ती तपासणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी डॉ. इंगोले यांनी सांगितले. त्यांनी कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाच्या शिफारशींना मान्यता दिली असून, शेतीसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयोगी आहे. या तंत्रज्ञानाचा कृषी विभागाने प्रसार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पावसाळ्य़ात दोन महिन्यांचा खंड पडण्याची शक्यता असल्यामुळे कृषी विभागाने पूर्वतयारी करण्याची सूचना त्यांनी केली.
पावसाचे दोन खंड पडणार!
By admin | Updated: June 6, 2014 01:17 IST