अकोला: वेतन तातडीने अदा व्हावे, अशी सर्वांंचीच इच्छा आहे. महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावावर शासन सकारात्मक असून, किमान दोन महिन्यांच्या वेतनाची जुळवाजुळव केली जात आहे. परिस्थिती लक्षात घेता, कर्मचार्यांनी दोन महिन्यांचे वेतन घेऊन संप मिटवावा, अशी सूचना मंगळवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांना केली. मुंबईत पालकमंत्र्यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत संपाच्या मुद्दय़ासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. चार महिन्यांचे वेतन थकीत असल्याची सबब पुढे करीत मनपा कर्मचारी संघर्ष समितीने संपाचे हत्यार उपसले आहे. मागील चौदा दिवसांपासून बेमुदत संपामुळे मनपाचे प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले असून, मूलभूत सुविधा प्रभावित झाल्या आहेत. थकीत वेतनासह पाचव्या वेतन आयोगातील फरकाच्या रकमेवर प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी तोडगा काढण्यासाठी संघर्ष समिती आग्रही आहे. यासाठी लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर थाळी वाजवा आंदोलनही करण्यात आले होते. संपाचा वाढत जाणारा कालावधी पाहता, पालक मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी मुंबईत त्यांच्या दालनात संपाच्या विषयासह विविध मुद्दय़ांवर बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत आमदार गोपीकिशन बाजोरिया, मनपा आयुक्त अजय लहाने यांच्यासह संघर्ष समितीचे अध्यक्ष पी.बी.भातकुले, अनूप खरारे उपस्थित होते. कर्मचार्यांच्या थकीत वेतनाची समस्या लक्षात घेता, मनपाच्या प्रस्तावानुसार ह्यएस्क्रोह्ण खात्यातील ५ कोटी ८0 लाख रुपये आणि एलबीटी अनुदानाच्या ३ कोटी ६३ लाखांसह मोबाइल कंपनीकडून प्राप्त ४ कोटी २८ लाख रुपयांची वेतनासाठी तरतूद करण्यात आल्याचे पालकमंत्री डॉ. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. या रकमेतून कर्मचार्यांचे दोन महिन्यांचे वेतन अदा होऊ शकते. शहरातील मालमत्ताधारकांकडे सात ते आठ क ोटी रुपये टॅक्स थकीत आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी कर्मचार्यांनीसक्रिय होण्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दोन महिन्यांचे वेतन घ्या अन संप मिटवा!
By admin | Updated: June 8, 2016 02:20 IST