लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व सांडपाण्याचा प्रश्न लक्षात घेता, शहराकरिता पूरक पाणी पुरवठा योजना व भूमिगत गटार योजना शासनाकडून मंजूर करण्यात आली असल्याची माहिती आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पत्रकारांना दिली.पूरक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पोपटखेड धरणावरून जलशुद्धीकरण केंद्रामधून गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे जलकुंभात पाणी आणले जाणार आहे. तेथून शहरात २४ तास पाणी पुरवठा करण्यात येईल. ही योजना पूर्ण केल्याच्या अटीवरच शासनाने भुयारी गटार योजनासुद्धा मंजूर केली असून, या दोन्ही योजनेबाबत अंदाजपत्रक तयार करून भविष्यात कामाला सुरुवात केल्या जाणार असल्याचे भारसाकळे म्हणाले. यावेळी त्यांनी अकोट नगर परिषद कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीकरिता ३ कोटी तर स्मशानभूमीच्या विकासाकरिता १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सतत पाठपुरावा व प्रयत्न करूनही मोठी योजना मंजूर करून आणल्याने पायाभूत सुविधा विकास कामांना प्राधान्यक्रम देत या योजना राबविण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, नगरसेवक मंगेश लोणकर, सभापती विनोद कपले, मंगेश चिखले, लता साबळे यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य, नगरसेवक व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अकोटसाठी पूरक पाणीपुरवठा; भुयारी गटार योजना मंजूर!
By admin | Updated: June 13, 2017 00:33 IST