बुलडाणा : वेगवेगळ्या दोन घटनेत संग्रामपूर येथील एका अल्पभूधारक शेतकरी व खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथील अल्पभूधारक शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना ५ जानेवारीला उघडकीस आली. संग्रामपूर येथील ४५ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर रामभाऊ राजनकर यांनी ५ जानेवारीला बटाईच्या शेतात काम सुरू असताना विष घेतले. ही बाब काही मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी धावपळ करून त्यांना उपचारार्थ संग्रामपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वरवट बकाल येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे त्यांना वरवट बकाल येथे रुग्णालयात आणत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृतक ज्ञानेश्वर राजनकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली असा परिवार आहे. तर दुसर्या घटनेत खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथील डिगांबर नथ्थू तायडे (वय ३८) यांच्या आईच्या नावे ४ एकर शेती आहे. आई वृद्ध असल्याने डिगांबर तायडे हेच शेतीचे काम करीत होते. दरम्यान, काल ४ जानेवारी रोजी ते घराबाहेर गेले; मात्र परत आले नाही. तर ५ जानेवारी रोजी डिगांबर तायडे यांनी शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी कलम १७४ जाफौनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतकाच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, २ मुले, मुलगी असा आप्त परिवार आहे.
दोन अल्पभूधारक शेतक-यांच्या आत्महत्या
By admin | Updated: January 6, 2015 00:17 IST