अकोला, दि. २९: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत चालविण्यात येणार्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये अकोल्याचा राष्ट्रीय फुटबॉलपटू अ.सुफीयान अ.फहीम शेख याला बालेवाडी(पुणे) येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये थेट प्रवेश मिळाला. उच्चतम खेळाडू राज्याला मिळावे,याकरिता महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे राज्यात विविध अकरा ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी ही योजना राबविण्यात येत आहे. क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळविण्याकरिता गावपातळीपासून राज्यस्तरापर्यंत क्रीडा नैपुण्य चाचणीचे आयोजन जून-जुलैमध्ये करण्यात येते; परंतु सुफीयान हा राष्ट्रीय फुटबॉलपटू असल्यामुळे त्याला क्रीडा प्रबोधिनीमध्ये थेट प्रवेश देण्यात आला. सुफीयान हा सेन्ट अँन्स स्कूलचा विद्यार्थी होता. मागीलवर्षी त्याने रायपूर (छत्तीसगड) येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले होते. सुफीयान हा १४ वर्षाआतील असूनदेखील १७ वर्ष वयोगटामध्ये चपळतेने खेळतो, हे येथे उल्लेखनीय आहे. यंदा सुफीयान हा २ ऑक्टोबरपासून दिल्ली येथे होणार्या सुब्रतो मुखर्जी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत खेळप्रदर्शन करणार आहे. सुफीयानचे आजोबा शेख चांद यांनी फुटबॉलचा एक काळ गाजविला आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाचे अनेक उच्चस्तर स्पर्धेत शेख चांद यांनी प्रतिनिधीत्व केले, तसेच वडील फहीम शेख हेदेखील राष्ट्रीय फुटबॉलपटू असून, अकोला पोलीस विभागाचे अनेक राज्य, राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले. फहीम शेख सध्या बोरगाव पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत. सुफीयानला प्रशिक्षक धीरज मिश्रा यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
सुफीयान शेखला क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश
By admin | Updated: August 30, 2016 02:04 IST