अकोला : शहरासाठी स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीचा (डीसी रूल) प्रस्ताव नगर रचना विभागाच्या (पुणे) संचालकांनी शासनाकडे तातडीने सादर करण्याचे निर्देश नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. बुधवारी डॉ.पाटील यांच्या दालनात राज्यभरातील मनपामध्ये लागू होणार्या डीसी रूलच्या मुद्यावर बैठक आयोजित केली होती. बैठकीला आयुक्त सोमनाथ शेटे उपस्थित होते. डीसी रूलचा प्रस्ताव निकाली काढण्यासाठी नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यानुषंगाने बुधवारी पालकमंत्र्यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल) लागू नसल्यामुळे बांधकाम व्यवसाय कोलमडल्याची स्थिती आहे. मनपाने डीसी रूलचा प्रस्ताव नगर रचनाच्या संबंधित अधिकार्यांकडे जानेवारी महिन्यात सादर केला होता. २२ जानेवारीला हा प्रस्ताव विभागीय कार्यालय अमरावतीमार्फत नगर रचनाच्या पुणे येथील संचालकांकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावासह राज्यातील इतरही मनपामध्ये डीसी रूल लागू करून प्राप्त प्रस्तावांच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी नगर विकास राज्यमंत्र्यांनी नगर रचना विभागाच्या संचालकांकडून आढावा घेतला. तसेच संबंधित प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले. मनपाने सुजल निर्मलचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्याची सूचना मनपा आयुक्त सोमनाथ शेटे यांना करण्यात आली. यावेळी हद्दवाढ करण्याचे सुचक संकेत डॉ.पाटील यांनी दिले. बैठकीला शासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसह आयुक्त सोमनाथ शेटे, शहर अभियंता अजय गुजर उपस्थित होते.
‘डीसी रूल’चा प्रस्ताव तातडीने सादर करा
By admin | Updated: February 26, 2015 01:28 IST