आशिष गावंडे / अकोला
महापालिकेच्या विविध विभागात वयाची ५५ वर्षे पूर्ण करणार्या कर्मचार्यांवर गंडांतर आले आहे. या कर्मचार्यांना आता शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचा दाखला देणे प्रशासनाने अनिवार्य केले असून, वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी दिले आहेत. वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करू न शकणार्या कर्मचार्यांना सेवेतून कमी करण्याचा अप्रत्यक्ष फतवा उपायुक्तांनी जारी केल्याने कर्मचार्यारी धास्तावले आहेत. मनपाच्या आस्थापनेवरील ७४२ सफाई कर्मचार्यांच्या नियुक्तीत व नेमणुकीत घोळ असल्याची सबब पुढे करीत, आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी सफाई कर्मचार्यांची हजेरी घेतली. अनेक सफाई कर्मचारी कामावर प्रत्यक्षात उपस्थित राहत नसल्याची परिस्थिती आहे. यावर तोडगा म्हणून प्रशासनाने मध्यंतरी सफाई कर्मचार्यांची प्रभागांतर्गत अदला-बदल करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे साफसफाईची समस्या निकाली निघेल, ही अपेक्षा फोल ठरली. या कामासाठी उपायुक्त चिंचोलीकर यांनी मनपाची संपूर्ण यंत्रणा वेठीस धरली होती. हाच कित्ता पुन्हा गिरवला जात आहे. महापालिकेच्या विविध विभागात वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचार्यांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी दिले आहेत. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून शारीरिक आरोग्य चाचणी करून घेण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांकडून प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे संबंधित कर्मचार्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. प्रमाणपत्र सादर न करू शकणार्या किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या कर्मचार्यांना सेवेतूून कमी केले जाणार असल्याचा अप्रत्यक्ष फतवा प्रशासनाने जारी केल्याने कर्मचार्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.