बुलडाणा : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्याच्या वाहनांना टप्पा वाहतूक करण्याची परवानगी केंद्र शासनाकडून लवकरच मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यासाठी केंद्र शासनाने राज्यातील सर्व वाहतूकदारांना सूचनाही मागविल्या आहेत. असे झाल्यास गावखेड्यापासून डोंगर-दर्यातून धावणारी एसटी रस्त्यावरून गायब होणार आहे. त्याचा राज्य परिवहन महामंडळाबरोबरच सामान्य जनतेला मोठा फटका बसणार आहे. सध्या सर्वत्र खासगीकरणाचे वारे वाहात असताना आता खासगीकरणाचा बळी एसटी महामंडळ ठरणार आहे. असे झाल्यास एसटीचे हजारो कामगार व कर्मचारी देशाधडीला लागणार आहेत. इलेक्ट्रॉनिक, इंटरनेटच्या आजच्या युगात सर्वांनीच बदल स्वीकारला आहे; मात्र प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात एसटीचे नव्या बदलाकडे पाठ फिरवून तेच परंपरागत धोरण कायम ठेवले आहे. प्रवाशांना काय हवे, काय नको, याची जाणीव न ठेवता वर्षानुवर्षे त्याच गतीने आणि भूमिकेने एसटी वाटचाल करीत आहे. त्याचा परिणाम म्हणजे एसटी महामंडळाची प्रवासी संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहे. दुसरीकडे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा पुरविणार्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या नव-नवे प्रयोग करीत आहेत, त्यामुळे प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत आहेत. सिझनचा काळ वगळता एसटीचे प्रवासभाडे नेहमीच खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला प्राधान्य देत आहेत. त्यातच एसटीची स्पिड लॉक पद्धती, कर्मचार्यांना लागणार्या सुविधा, अवाजवी राजकीय हस्तक्षेप आणि अंतर्गत राजकारण यातच एसटी महामंडळ धन्यता मानत असल्याने बदल स्वीकारण्यामध्ये एसटी कमी पडत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी, हे ब्रीद घेऊन एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूक सुरू केली; परंतु बदलत्या काळानुसार एसटीला आपल्या धोरणात बदल करणे शक्य झाले नाही. या कारणामुळे एसटीचे प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत असून, आजच्या स्पर्धेच्या युगातही एसटी महामंडळाची कासवगतीने वाटचाल सुरू आहे.
एसटी पुन्हा खासगीकरणाकडे
By admin | Updated: November 29, 2014 23:01 IST