सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय दूध डेअरी परिसरात असलेल्या शास्त्रीनगर येथील रहिवासी मनोज हरिराम शर्मा (वय २२ वर्षे) हा सुमारे ४३ लाख ३०० रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन रेल्वेस्थानकावर होता. ही बॅग तो विदर्भ एक्सप्रेसमध्ये मुंबईकडे प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडे देणार होता; ती बॅग ज्या प्रवाशाकडे देणार होता, त्या प्रवाशाचे नाव किंवा इतर माहिती शर्मा यांच्याकडे नव्हती मात्र दि पप्पी शॉप स्टेशन रोडच्या मालकाने बोगी बी ४ च्या दारात उभे असलेल्या अज्ञात व्यक्तीच्या हातात देण्याचा इशारा शर्मा यास देण्यात आला होता; मात्र याची माहिती अकोला आरपीएफला मिळताच त्यांनी रेल्वेस्थानकावर सापळा रचला. मनोज शर्मा हा रोकड असलेली बॅग रेल्वेतील प्रवाशाच्या हातात देत असताना अकोला आरपीएफने छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४३ लाखांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. या रकमेचे विवरण तसेच दस्तावेज मागितला असता मनोज शर्मा याने दस्तावेज देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे ही रक्कम हवाल्याची असल्याचे समाेर आले असून, आता या प्रकरणाचा तपास जीआरपीने सुरू केला आहे़
हवाल्याची माेठी उलाढाल
हवाला रकमेची माेठी उलाढाल अकाेल्यातून हाेत असल्याचे वास्तव आहे़ यामध्ये अकाेल्यातील एका माेठ्या व्यक्तीचा सहभाग असून, त्याचेच चेले चपाटे ही रक्कम रेल्वेने घेऊन जात असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे़ पाेलिसांची नजर चुकवून राेजच ही रक्कम पाठविण्यात येत असल्याने यामध्ये अनेकांचे हात ओले झाल्याचे सूत्रांनी सांगितले असून, या प्रकरणात अकाेला पाेलिसांनी कारवाई केल्यानंतर आता तपासात काही नावे उघड हाेण्याची शक्यता आहे़