अकोला: पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात सोमवारी दुपारी १२.३0 ते २.३0 वाजेपर्यंत चाललेल्या पोलीस क्राइम मीटिंगमध्ये पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी शहरात गत काही दिवसांपासून लुटमार, चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करून महिला, युवती, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याचे आणि गस्त वाढविण्याचा आदेश दिला. गत काही दिवसांपासून शहरात सातत्याने चेन स्नॅचिंगच्या घटना घडत आहेत. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. महिलांसोबतच आता चोरटे ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करीत आहेत. गत काही दिवसांमध्ये ८ चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. परंतु पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात अपयश आले आहे. यावर पोलीस अधीक्षकांनी नाराजी व्यक्त करून ठाणेदारांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात आणि घटनांवर नियंत्रण मिळवावे, असा आदेश दिला. यासोबतच महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास करताना, तपास अधिकार्यांनी, ठाणेदारांनी संपूर्ण ताकदीनिशी आणि पुराव्यांसह तपास करावा. सबळ पुरावे, साक्षीदारांसह तपास पूर्ण केला, तर आरोपींना शिक्षा ठोठावण्यात न्यायालयाला यश येईल आणि आपल्याला उत्तमप्रकारे तपास केल्याचे समाधान मिळेल. याबाबतही पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मार्गदर्शन केले. क्राइम मीटिंगला अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय सागर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण यांच्यासह जिल्हय़ातील सर्व पोलीस ठाण्यांचे ठाणेदार प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
लुटमार, चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांवर 'एसपीं'ची नाराजी!
By admin | Updated: December 22, 2015 16:43 IST