अकोला: जिल्ह्यातील शहरालगतच्या गावांमध्ये गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत झालेली बांधकामे तसेच अनधिकृत बांधकामांची तपासणी लवकरच महसूल विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे. या तपासणीत बांधकामांची माहिती नोंदविण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तहसील स्तरावर ह्यत पासणी फॉर्मह्ण १२ मे रोजी वितरित करण्यात आले. २३ एप्रिल २0१२ च्या शासन निर्णयान्वये अकोला-वाशिम प्रादेशिक योजना मंजूर करण्यात आली असून, १५ जून २0१२ पासून ही योजना अंमलात आली. या प्रादेशिक योजनेकरिता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १८ नुसार जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून जिल्हाधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नगर विकास विभागाच्या या आदेशानुसार महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील इतर क्षेत्रात बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार अकोला महानगर पालिका व जिल्हय़ातील नगरपालिका क्षेत्रालगत गावातील बांधकामांसाठी जिल्हाधिकार्यांकडून परवानगी आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर १५ जून २0१२ ते २७ एप्रिल २0१५ या कालावधीत जिल्ह्यातील शहरालगतच्या ४0 गावांमध्ये करण्यात आलेली बांधकामे तसेच अनधिकृत बांधकामांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी २७ एप्रिल रोजी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर, तेल्हारा व आकोट इत्यादी सहा शहरानजिकच्या ४0 गावांमध्ये करण्यात आलेली बांधकामे व त्यामध्ये अनधिकृत करण्यात आलेली बांधकामे यासंदर्भात तपासणीचे काम लवकरच महसूल विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे.
शहरालगतच्या अनधिकृत बांधकामांची लवकरच तपासणी
By admin | Updated: May 16, 2015 00:55 IST