अकोला: महाजल पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याने, गावात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावात निर्माण झालेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा, या मागणीसाठी वाघजाळी येथील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अन्यथा ११ एप्रिलपासून गावात उपोषण सुरू करणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनात देण्यात आला. बाश्रीटाकळी तालुक्यातील वाघजाळी येथे महाजल पाणीपुरवठा योजनेचे काम सन २00८ मध्ये ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला देण्यात आले होते. या योजनेच्या कामावर २३ लाख रुपये खर्चही झाला; मात्र योजनेचे काम ४0 टक्के करण्यात आले. योजनेचे काम पूर्ण झाले नसल्याने, गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे योजनेच्या कामात भ्रष्टाचार करणारांवर कारवाई करण्यात यावी आणि गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांकडे सादर करून गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अन्यथा ११ एप्रिलपासून गावात ग्रामस्थ बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला. यावेळी वाघजाळी येथील विकी करवते, गोपाल वाळेकर, आनंद सिरसाट, सनी सिरसाट, रवींद्र सिरसाट, हरिदास टाले, गौतम सिरसाट यांच्या गावातील महिला-पुरुष उपस्थित होते.
पाणीप्रश्न सोडवा; अन्यथा उपोषण!
By admin | Updated: March 29, 2016 02:28 IST