अकोला : खडकीनजीक असलेल्या पुलाजवळ मांस घेऊन जाणारा ऑटो व एका वाहनामध्ये झालेल्या अपघातानंतर मांसाची तस्करी उघड झाली. या प्रकाराची माहिती मिळताच खदान पोलिसांनी ऑटोचा पाठलाग करीत सुमारे ३ पोते मांस पकडले असून, मांसाची वाहतूक करणार्या एका जणास अटक केली.बाश्रीटाकळी येथील रहिवासी अब्दुल खलील अब्दुल गणी हा एम एच ३0 पी ९८२२ क्रमांकाच्या ऑटोमध्ये तीन पोते मांस घेऊन जात असतांना त्याच्या ऑटोसोबत संजय पाठक यांच्या वाहनाची धडक झाली. या अपघातात ऑटोतील तीन पोते मांस रस्त्यावर आले. या मांसाची परिसरात दुर्गंधी पसरताच खदान पोलिसांनी ऑटोचालकास तत्काळ अटक केली. त्याचा ऑटो व तीन पोते मांसही पोलिसांनी जप्त केले. सदरच मांस गोवंशाचे आहे किंवा इतर जनावरांचे याचा शोध घेण्यासाठी खदान पोलिसांनी मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यानंतर पोलिसांनी सदर मांस नष्ट करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. मात्र, न्यायालयाने सदर निर्णय राखून ठेवल्याने हे मांस एक दिवस पोलीस स्टेशनमध्येच ठेवण्यात आले आहे.मांसाच्या दुर्गंधीने पोलीस हैराणमांस नष्ट करण्याचा निर्णय न्यायालयाने सोमवारपर्यंत राखून ठेवला. त्यामुळे पोलिसांनी सदरचे मांस जप्तीत व्यवस्थित ठेवले आहे. मांस पोलीस स्टेशनमध्ये ठेवल्यानंतर याची प्रचंड दुर्गंंधी सुटली असून, ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी कमालीचे हैराण झाले आहेत. मांसाच्या दुर्गंधीमुळे कुत्रेही पोलीस स्टेशनच्या आवारात आले होते.
अपघातामुळे उघडकीस आली मांसाची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 02:20 IST