संतोष गवई /शिर्ला : राष्ट्रीय महामार्गावरील झाडांना रात्री आग लावून नंतर वृक्षांची कत्तल करण्यात येत असल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी अकोला-पातूर रोडवर उजेडात आला. वृक्ष रस्त्यावर कोलमडल्याने काही वेळ महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. महामार्गावरील वृक्षांचे संवर्धन व सुरक्षेच्या जबाबदारीबाबत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभाग एकमेकांकडे बोट दाखवित असल्याचेही या प्रकाराच्यानिमित्ताने समोर आले. वृक्षांच्या कत्तलीचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती मोहीमही राबविण्यात येते. विद्यार्थ्यांंना शाळा-महाविद्यालयातून वृक्षसंवर्धनाचे धडेही देण्यात येतात. मात्र, तरीही वृक्षांची कत्तल होत आहे. दरम्यान, अकोला-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील शिर्ला पातूर रोडवरील एका झाडाच्या बुंध्याला आग लावून ते पाडण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उजेडात आला. हे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. काही वेळ एकतर्फी वाहतूक सुरू होती. रात्री उशिरापर्यंंतही वृक्ष रस्त्याच्या बाजूला करण्यात आला नव्हता.
महामार्गावर झाडांची कत्तल; वृक्ष संवर्धनाच्या जबाबदारीची टोलवाटोलवी
By admin | Updated: May 16, 2015 00:45 IST