जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे जिल्ह्यात शुक्रवारपासून मुख्यमंत्री महाआरोग्य अभियानाला सुरुवात करण्यात आली. अभियानांतर्गत पहिल्याच दिवशी जिल्हा स्त्री रुग्णालय येथे ३० प्रशिक्षणार्थींचा सहभाग होता. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ असावे यासाठी आरोग्य क्षेत्रातील विविध कौशल्य विकास प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरू झालेल्या या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना ‘जनरल ड्युटी असिस्टंट ॲडव्हान्स क्रिटिकल केअर’ या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सध्या दिले जात आहे. दररोज पाच तास हा प्रशिक्षण वर्ग चालणार आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता या प्रशिक्षणातून तयार झालेले मनुष्यबळ कोविड काळात आरोग्यसेवेत कामी येणार आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल यांच्या मार्गदर्शनात प्रशासकीय अधिकारी डॉ. जोगी, प्रशिक्षक डॉ. जगदीश खंडेतोड, डॉ. कुंदन चव्हाण, समन्वयक चेतना काळे यांच्यासह डॉक्टर व वैद्यकीय चमू या प्रशिक्षणासाठी परिश्रम घेत आहे.
५०० तासांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण
हे प्रशिक्षण ५०० तासांचे राहणार असून सुमारे अडीच महिने चालणार आहे. यामध्ये ऑक्सिजन सिलिंडर लावणे, रुग्णाला बेडवर घेणे, रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर त्याला योग्य माहिती पुरविणे, रुग्णास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविणे यासह विविध तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अंतर्गत प्रशिक्षित प्रशिक्षणार्थीला कोविड अंतर्गत होणाऱ्या पदभरतीमध्ये प्राधान्य दिले जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोण होऊ शकते सहभागी १८ ते ४५ वयोगटातील कुठलीही व्यक्ती प्रशिक्षणासाठी पात्र ठरू शकते.
त्यासाठी इच्छुक उमेदवार हा १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असावा.
प्रशिक्षणासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोंदणी आवश्यक.