अकोला: क्रीडा स्पर्धेतून निर्माण झालेला जोश व चैतन्य कर्मचार्यांनी कामातून दाखवावे आणि कामाचा दर्जा उंचवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी रविवारी येथे केले. अकोला जिल्हा परिषदेच्यावतीने शहरातील वसंत देसाई स्टेडियम येथे आयोजित जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, वाशिम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे, देवानंद गणोरकर, रवींद्र गोपकर, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे राजूरकर म्हणाले की, जिल्हा परिषदेत काम करणार्या कर्मचार्यांवर तणाव असतो. मात्र विभागीय क्रीडा स्पर्धेतून कर्मचार्यांमध्ये जोश आणि चैतन्य निर्माण झाले असेल, असे सांगत स्पर्धेतून निर्माण झालेल्या चैतन्यातून आता कर्मचार्यांनी काम करावे. स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढविण्याची गरज असून, त्यासाठी कर्मचार्यांनी काम करण्याची गरज आहे. कामाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले. कर्मचार्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी क्रीडा स्पर्धांंची गरज असून, या क्रीडा स्पर्धेतून निर्माण झालेल्या उज्रेतून कर्मचार्यांनी काम करावे आणि कामाच्या दृष्टीने अमरावती विभाग किमान चौथ्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावा, असे मत यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी यावेळी मांडले. कर्मचार्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांंचे आयोजन झाले पाहिजे, अशी अपेक्षा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी, तर संचालन प्रकाश मानकर व मोंटू सिंग यांनी केले. आभार डॉ. मनोहर तुपकर यांनी मानले.
स्पर्धेतून निर्माण झालेले चैतन्य कामातून दाखवा!
By admin | Updated: January 19, 2015 02:47 IST