अकोला: तूर खरेदीच्या मुद्यावरून जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना अपशब्दाचा वापर केल्याचा आरोप करत जिल्हा शिवसेनेच्या वतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पुतळ््याला चपलांचा मार देण्यात आला. स्थानिक मदनलाल धिंग्रा चौकात भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत शिवसेनेने भाजप सरकार विरोधात जोरदार नारेबाजी केल्याचे चित्र गुरुवारी दुपारी पाहावयास मिळाले. सेनेच्या आंदोलनामुळे काही काळासाठी मुख्य मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. तूर खरेदीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. तुरीचा शेवटचा दाणा संपेपर्यंत तूर खरेदी करणार असल्याची घोषणा सरकारने केली होती. सुरुवातीला नाफेडने तूर खरेदी केल्यानंतर बंद केली. शेतकऱ्यांनी ओरड करताच पंचनामा झालेली तूर खरेदी करण्याचे आश्वासन देत नाफेडने पुन्हा तूर खरेदी सुरू केली. यामध्ये बारदाणा नसणे, मोजमाप करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर बाजार समित्यांच्या आवारात बेवारस स्थितीत पडून आहे. अशा स्थितीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची शेतकऱ्यांबाबत बोलताना जीभ घसरली. जालना येथील कार्यक्रमात त्यांनी तूर खरेदीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांना अपशब्दाचा वापर केल्याचे समोर आले. दानवे यांच्या वक्तव्याचे पडसाद अकोल्यात उमटले. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात मदनलाल धिंग्रा चौकात रावसाहेब दानवे यांच्या पुतळ््याला चपलांचा हार घालून निषेध नोंदविण्यात आला. भाजप सरकार शेतकरीविरोधी असल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. मुख्य मार्गावर शिवसेनेच्या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. आंदोलनात मा. आमदार संजय गावंडे, श्रीरंग पिंजरकर, बंडूभाऊ ढोरे, रवींद्र पोहरे, दिलीप बोचे, गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, विजय मोहोड, अप्पू तिडके, गजानन मानतकार, विकास पागृत, संजय शेळके, रवी मुर्तडकर, श्याम गावंडे, अतुल पवनीकर, संतोष अनासने, तरुण बगेरे, अभिषेक खरसाडे, अश्विन नवले, दिनेश सरोदे, प्रदीप गुरुखुद्दे, सागर भारुका, अश्विन पांडे, कालू गायकवाड, संजय भांबेरे, सुनीता मेटांगे, राजेश्वरी शर्मा, ज्योत्स्ना चोरे, शुभांगी किनगे आदींसह असंख्य शिवसैनिक सहभागी होते.
दानवे यांच्या पुतळ्याला शिवसेनेने दिला चपलांचा मार
By admin | Updated: May 12, 2017 08:19 IST