तेल्हारा (अकोला): अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने तेल्हारा शहरात गुटख्याचा पुरवठा करणार्या दोघांना पकडून त्यांच्याकडून ५ लाख १0 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या घटनेनंतर पथकाने बोलेरो वाहन जप्त करून गुटख्याची अवैध वाहतूक करणार्या दोघांना अटक करून तेल्हारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई रविवार, १८ जानेवारी रोजी पहाटे करण्यात आली. संपूर्ण राज्यात बंदी असतानाही तेल्हारा शहर व तालुक्यात राजरोसपणे गुटख्याची विक्री सुरू आहे. मोठय़ा प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी आर. एस. वाकडे हे विशेष पोलीस पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक एस.के. जाधव व त्यांचे तीन सहकार्यांसह शनिवारी रात्री तेल्हारा शहरात दाखल झाले. माळेगाव बाजार येथील कल्लू ऊर्फ कलीम खाँ शब्बीर खाँ (२८) व तेल्हारा येथील मोहम्मद हनिफ अ. रहेमान (४८) हे एम. एच. ३0 ए. पी. २७९५ क्रमांकाच्या बोलेरो गाडीतून गुटख्याची वाहतूक करीत असताना या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून विमल गुटख्याचे ३४00 पाकीट व विमल मसाला ३४00 पाकीट, असा एकूण ५ लाख १0 हजार रुपयांचा माल ताब्यात घेतला. तसेच दोन लाख रुपये किमतीची बोलेरो गाडीही जप्त करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पुढील कारवाईसाठी हे प्रकरण तेल्हारा पोलिसांकडे दिले. तेल्हारा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली. पुढील तपास ठाणेदार शे. अन्वर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रवींद्र करणकार, ए.एस.आय. गणेश पाचपोर, कॉन्स्टेबल विनोद गोलाईत करीत आहेत.
तेल्हा-यात पाच लाखांचा गुटखा जप्त
By admin | Updated: January 19, 2015 02:38 IST