अकोला : परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्यांचा शोध घेण्यासाठी, सावकारांकडून वाटप करण्यात आलेल्या कर्जाची माहिती सादर करण्याचे निर्देश सहकार खात्याकडून देण्यात आले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांकडून नोव्हेंबर अखेरपर्यंत वाटप करण्यात आलेल्या कर्जाची माहिती घेण्याचे काम जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सुरू करण्यात आले असून, कर्ज वाटपाचे ह्यरेकॉर्डह्ण दोन दिवसात सादर करण्याचे निर्देशही सावकारांना देण्यात आलेत. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प झालेला पाऊस, हातून गेलेली पिके आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनामार्फत सात हजार कोटींचे ह्यपॅकेजह्ण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये दुष्काळग्रस्त भागात परवानाधारक सावकारांकडून शेतकर्यांनी घेतलेले कर्ज माफ करण्यात आल्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. परवानाधारक सावकारांकडून कर्जदारांना दिल्या जाणार्या पावतीवर कर्जदाराचा व्यवसाय नमूद केला जात नाही. त्यामुळे परवानाधारक सावकारांकडून कर्ज देण्यात आलेल्या एकूण कर्जदारांपैकी शेतकरी कर्जदार किती, याबाबतची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयांसह सहकार खात्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे परवानाधारक सावकरांकडून वाटप करण्यात आलेल्या एकूण कर्जदारांपैकी शेतकरी कर्जदार किती याबाबतचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याचे सहकार सचिव देवरा यांनी शनिवारी नागपूर येथील विधान भवनात राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधक आणि सहनिबंधकांची बैठक घेऊन, परवानाधारक सावकारांकडून नोव्हेंबर अखेरपर्यंत वाटप करण्यात आलेल्या कर्जाची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अकोला जिल्हय़ातील १९६ परवानाधारक सावकारांकडून वाटप करण्यात आलेल्या कर्जांसंबंधी माहिती घेण्याचे काम रविवारपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सुरू करण्यात आले. त्यामध्ये वाटप करण्यात आलेले कर्ज, कर्जदारांना देण्यात आलेल्या पावत्या आणि व्यवसायाच्या नोंदी इत्यादी प्रकारची माहिती घेण्यात येत आहे.
सावकारी कर्जाचे मागितले ‘रेकॉर्ड’
By admin | Updated: December 22, 2014 01:17 IST