तेल्हारा: तालुक्यात गत काही दिवसांपासून रोहीत्र फोडून त्यातील तांब्याची क्वाईल चोरणारी टोळी सक्रीय झाली असून रोहीत्र चोरीचे हे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. चोरट्यांनी वाडी इसापुर शेत शिवारातील विद्युत रोहीत्र फोडून त्यातील तांब्याची क्वाईलसह ३० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना २० मे च्या रात्री घडली.तेल्हारा तालुक्यात वान धरणात पाणी न पोहचू शकणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळावा याकरिता १५० कुपनलिका खोदण्यात आल्या होत्या. सदर कुपनलिकांवर २० अश्वशक्तीचे मोटारपंप बसविण्यात आल्याने त्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी २५ केव्हीएचे रोहीत्र बसविण्यात आले होते. रोहीत्र अडगाव, हिवरखेड, दानापूर, तेल्हारा अर्बन १, तेल्हारा अर्बन २, भांबेरी आदी सबस्टेशनअंतर्गत बसविण्यात आले होेते. रोहीत्र बसविल्यानंतर काही दिवसातच चोरट्यांनी हे रोहीत्र फोडून यातील तांब्याच्या क्वाईल चोरुन नेण्याचा सपाटा लावला. गत काही वर्षात हिवरखेड व तेल्हारा पोलिस स्टेशन अंतर्गत १०० च्या वर रोहीत्र चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, रोहीत्र चोरट्यांचा मागोवा घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे. तालुक्यातील वाडी इसापुर येथील जगन्नाथ बारुळकर यांच्या शेतशिवारातील २५ के व्हीचे रोहीत्र फोडून त्यातील ६० किलो क्वाईल किंमत २० हजार व १०० लिटर आॅईल किंमत १० हजार असा ३० हजाराचा ऐवज २० मे च्या रात्री चोरट्यांनी लंपास केला. भांबेरी येथील कनिष्ठ अभियंता आशीष नावकार यांनी तेल्हारा पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय खेकडे करीत आहेत.
रोहित्र फोडण्याचे सत्र सुरूच, ३० हजारांचा एवज लंपास
By admin | Updated: May 22, 2017 19:53 IST