रिसोड (जि. वाशिम): स्थानिक व्यापारी कल्पेश वर्मा यांच्या आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेले रिसोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांना १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता न्यायालयात हजर केले असता, विद्यमान न्यायाधिशांनी पानझाडे यांना २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. शहरातील व्यापारी कल्पेश वर्मा यांनी भूखंडाचा वाद व घर बांधकाम पाडण्याची नोटीस या कारणामुळे ७ एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण व आत्महत्येस जबाबदार असणारी एक व्यक्ती व अन्य तिघे अशी नावे लिहून ठेवली होती. यासंदर्भात कल्पेशचा भाऊ गोविंद वर्मा यांनी १0 एप्रिल रोजी रिसोड पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्यानंतर, नगरसेविका मीना अग्रवाल, अशोक अग्रवाल, सुनील बगडिया व मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांच्या विरुद्ध भादंवि कलम ३0६, ३४ अ अन्वये गुन्हा दाखल केला. या अनुषंगाने मुख्याधिकारी पानझाडे यांना १४ एप्रिल रोजी अमरावती येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याविरुद्ध पुन्हा कलम १२0 ब, १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात हजर केले असता पानझाडे यांना न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली.
रिसोड नपचे मुख्याधिकारी न्यायालयीन कोठडीत
By admin | Updated: April 16, 2016 01:36 IST