अकोला : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेला गैरहजर राहिलेल्या जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्यांवर (बीडीओ) शिस्तभंगाची कारवाई करण्याचा ठराव बुधवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. याबाबतचा ठराव शासनाकडे पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले.जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेला अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी गैरहजर होते. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, पुंडलिक अरबट, विजय लव्हाळे, रामदास लांडे व इतर सदस्यांनी आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. या मुद्यावर आक्रमक झालेल्या सदस्यांनी सभेचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांना विचारणा केली असता, जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभेला हजर राहणार नसल्याबाबत गटविकास अधिकार्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पत्र दिल्याची माहिती देण्यात आली. त्यावर संताप व्यक्त करीत सभेला गैरहजर राहणार्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार सातही गटविकास अधिकार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. हा ठराव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांमार्फत शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयासह विभागीय आयुक्त आणि ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले. *डीओंना सीईओ पाठीशी घालत असल्याचा आरोप!जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभेला उपस्थित राहणार नसल्याबाबत पत्र देणार्या गटविकास अधिकार्यांना (बीडीओ) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पाठीशी घालत असल्याचा आरोप या सभेत सदस्यांनी केला.
गैरहजर सात ‘बीडीओं’वर कारवाईचा ठराव
By admin | Updated: May 7, 2015 01:32 IST